*मराठा आरक्षणासाठी किनवट कडकडीत बंद,आरक्षण मिळेपर्यंत संघर्ष सुरूच’चा निर्धार*
प्रतिनिधी : मार्कंडेय सिरामवार
किनवट : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी किनवट शहरासह तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदला व्यापारी, नागरिक आणि सकल मराठा समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाज, किनवट यांच्या वतीने शहरातून भव्य मोर्चा काढण्यात आला. जिजामाता चौकातून सुरू झालेला मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा फुले चौक, अण्णाभाऊ साठे चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत काढण्यात आला.
मोर्चात सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. मराठा आरक्षणाच्या मागणीच्या जोरदार घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला ठाम पाठिंबा देत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत संघर्षाची भूमिका कायम ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
किनवटमध्ये कडकडीत बंद आणि भव्य मोर्चाच्या माध्यमातून मराठा आरक्षणाच्या मागणीचा बुलंद आवाज प्रशासनापर्यंत पोहोचविण्यात आला.








