गणेशखिंड संशोधन केंद्राचे शेतकर्यांसाठीचे कार्य कौतुकास्पद – सहाय्यक महासंचालक डॉ. विश्व बी. पटेल
प्रतिनिधी : प्रमोद डफळ
राहुरी विद्यापीठ, दि. 7 सप्टेंबर, 2026 शेतकर्यांना दर्जेदार रोपे, आधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधनावर आधारीत मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यामध्ये विभागीय कृषि संशोधन केंद्र, गणेशखिंड, पुणे यांचे कार्य उल्लेखनीय असून मर्यादित मनुष्यबळ असतानाही या केंद्रातील शास्त्रज्ञ व कर्मचार्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे सहाय्यक महासंचालक (फळे व लागवडीची पिके) डॉ. विश्व बी. पटेल यांनी काढले.

नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे सहाय्यक महासंचालक (फळे व लागवडीची पिके) डॉ. विश्व बी. पटेल यांनी विभागीय कृषि संशोधन केंद्र, गणेशखिंड, पुणे येथे भेट देऊन केंद्राच्या विविध संशोधन व विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. विश्व बी. पटेल बोलत होते. याप्रसंगी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, पुणे येथील पुष्प संचालनालयाचे संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद, राजगुरुनगर येथील राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्राचे संचालक डॉ. राम दत्ता, संचालक संशोधन डॉ. प्रशांत बोडके, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, कृषि महाविद्यालय पुणेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुभाष भालेकर आणि गणेशखिंड येथील विभागीय कृषि संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. दत्तात्रय लाड उपस्थित होते.
या भेटीदरम्यान मार्गदर्शन करताना डॉ. पटेल म्हणाले शेतकर्यांसाठी केंद्रामार्फत राबविण्यात येत असलेले संशोधन व दर्जेदार रोपांचा पुरवठा करण्याचे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. यावेळी त्यांनी संशोधन केंद्रावरील प्राचीन पेशवेकालीन आंबा, आधुनिक रोपवाटिका, जैवविविधता वारसा केंद्र तसेच कृषि प्रदर्शनास भेट देऊन विविध उपक्रमांची माहिती घेतली. शेतकर्यांना गुणवत्तायुक्त रोपांचा पुरवठा करणार्या द्वितारांकित रोपवाटिकेच्या कार्याचे त्यांनी विशेष कौतुक केले. सुमारे 153 वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या संशोधन केंद्राच्या कार्याचा गौरव करत केंद्राच्या पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या.मनुष्यबळाची कमतरता असतानाही केंद्रातील शास्त्रज्ञांनी संशोधन व विकासाच्या क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य प्रशंसनीय असल्याचेही डॉ. पटेल यांनी नमूद केले. यावेळी संशोधन केंद्रातील सर्व शास्त्रज्ञ व कर्मचारी तसेच कृषि महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.








