अहिल्यानगर जिल्ह्यात डीजेला पूर्णपणे बंदी
कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाईचा जिल्हा पोलीस प्रमुख मुम्मका सुदर्शन यांचा इशारा
प्रतिनिधी : प्रमोद डफळ
राहुरी : डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे विविध दुर्घटना घडत असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राहुरी तालुक्यासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात डीजेला पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा जिल्हा पोलीस प्रमुख मुम्मका सुदर्शन यांनी दिला.
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवार, दि. ७ सप्टेंबर रोजी राहुरी नगरपरिषदेच्या सभागृहात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मार्गदर्शन करताना सुदर्शन बोलत होत्या. यावेळी श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, तहसीलदार डॉ. अमित पवार, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, उपनगराध्यक्ष गजानन सातभाई, मुख्याधिकारी विद्या पाटील आदी उपस्थित होते.
मुम्मका सुदर्शन म्हणाल्या की, डीजे बंदीबाबत पोलीस प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील गावागावांत जनजागृती करण्यात येत आहे. गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे. गावातील नेते, ज्येष्ठ नागरिक तसेच शासकीय कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रम राबवावा. हा उपक्रम राबविणाऱ्या गावांचा प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात येईल.
डीजेच्या मोठ्या आवाजामुळे नागरिकांना त्रास होण्याबरोबरच अनेक दुर्घटनांनाही सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यात डीजेवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही. त्यामुळे कायद्याचे उल्लंघन करू नये; अन्यथा संबंधितांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. गणेशोत्सव काळात डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.
बैठकीस नगरसेवक सोन्याबापू जगधने, प्रदीप भूजाडी, ॲड. राहुल शेटे, प्रतिक तनपूरे, नयन शिंगी, माजी नगरसेवक नंदुभाऊ तनपूरे, राजेंद्र उंडे, सुनील पवार, अक्षय तनपूरे, विरोधी पक्षनेते अरुण साळवे, देवेंद्र लांबे, आरिफ शेख, गणेश खैरे, नरेंद्र शिंदे, अप्पासाहेब ढुस, अशोक कदम यांच्यासह पत्रकार, गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








