स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून वाद , १५ हजारांच्या थकीत बिलापोटी वीज कापली. मुलांच्या परीक्षेवर परिणाम झाल्याचा आरोप.
बोरगाव मंजू उपकेंद्र क्षेत्रातील घटना; कर्मचाऱ्यांवर सखोल चौकशीची मागणी
मिलिंद इंगळे अकोला प्रतिनिधी:- बोरगाव मंजू येथे
थकीत बिलाचे कारण सांगत महावितरणने २९ ऑगस्ट रोजी एका ग्राहकाचा वीजपुरवठा थेट खंडित केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. ३१ ऑगस्टपासून लहान मुलांची नियमित प्रथम घटक चाचणी परीक्षा सुरू होत असतानाच ही कारवाई करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर गंभीर परिणाम झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
परीक्षा तोंडावर असताना निर्दयी कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ग्राहकाकडे सुमारे ₹१५,००० वीज बिल थकीत होते. ३१ ऑगस्टपासून मुलांची नियमित परीक्षा सुरू होणार असल्याने वीजपुरवठा खंडित करू नये, अशी विनवणी महावितरण कर्मचाऱ्यांना करण्यात आली होती. मात्र, अभ्यासाचा काळ विचारात न घेता कर्मचाऱ्यांनी २९ ऑगस्ट रोजीच लाईन कनेक्शन कापले.
तीन दिवस अंधार; अखेर स्मार्ट मीटरला मंजुरी
वीज बंद झाल्यामुळे सलग तीन दिवस विद्यार्थ्यांना अंधारात अभ्यासाला सामोरे जावे लागले. मुलांच्या शिक्षणाचे होणारे नुकसान पाहून हतबल झालेल्या ग्राहकाने अखेर स्मार्ट मीटर बसविण्यास संमती दिली. त्यानंतरच पुरवठा पूर्ववत झाल्याने, स्मार्ट मीटर बसविण्याच्या दबावापोटी ही कारवाई करण्यात आल्याचा संशय ग्राहकाने व्यक्त केला आहे.
वरिष्ठ कर्मचाऱ्यांकडे स्पष्टीकरणाची मागणी
या प्रकरणी बोरगाव मंजू ३३/११ केव्ही उपकेंद्रातील वसुली अधिकारी सिनियर टेक्निशियन प्रिया सुनील गवई आणि सिनियर टेक्निशियन वैजयंती रायबोल यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ही कारवाई केवळ नियमानुसार बिलापोटी होती की स्मार्ट मीटरच्या दबावासाठी, याची महावितरण प्रशासनाने सखोल चौकशी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.








