रायपूर पोलिसांचा चोख व कडक बंदोबस्त; चार गावांतील कावड यात्रा शांततेत संपन्न
सागर इंगळे | प्रतिनिधी |
रायपूर, दि. ०८ सप्टेंबर २०२६ : चौथ्या व श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारनिमित्त पोलीस स्टेशन रायपूर हद्दीतील पिंपळगाव सराई, साकेगाव, शिरपूर व पांगरी या चार गावांमध्ये मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात कावड यात्रांचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या संख्येने शिवभक्त या यात्रांमध्ये सहभागी झाले होते.
कावड यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच शिवभक्तांना सुरक्षित व शांततेच्या वातावरणात दर्शन व यात्रा पूर्ण करता यावी, यासाठी पोलीस स्टेशन रायपूरचे ठाणेदार निलेश सोळंके यांनी अत्यंत शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने पोलीस बंदोबस्ताचे नियोजन केले होते. सकाळी ०४.०० वाजल्यापासून पोलीस अंमलदार व होमगार्ड जवानांना विविध ठिकाणी तैनात करण्यात आले होते.
यादरम्यान ठाणेदार निलेश सोळंके यांनी स्वतः वेळोवेळी कावड यात्रांच्या ठिकाणी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच कावड यात्रा आयोजक, अध्यक्ष व स्वयंसेवक यांच्याशी संवाद साधून पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले. वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, तसेच एका यात्रेमुळे इतर भाविक किंवा नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी विशेष नियोजन करण्यात आले होते.
पोलीस अंमलदार व होमगार्ड जवानांच्या सतर्क बंदोबस्तामुळे चारही गावांतील कावड यात्रा अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध व पूर्णतः शांततेच्या वातावरणात पार पडल्या.
“शिवभक्तांच्या श्रद्धेला सुरक्षिततेची. साथ. आणि भक्तीच्या उत्साहाला पोलिसांच्या सेवाभावाची जोड” देत रायपूर पोलिसांनी आपली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली.
सदर कावड यात्रांच्या यशस्वी व शांततापूर्ण आयोजना बद्दल कावड यात्रा आयोजक, स्वयंसेवक व ग्रामस्थांनी पोलीस स्टेशन रायपूरचे ठाणेदार निलेश सोळंके तसेच सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार व होमगार्ड जवानांचे मनापासून आभार व्यक्त केले.
श्रद्धा जपताना सुरक्षिततेचा विश्वास देणारे पोलीस आणि शांतता राखण्यासाठी सहकार्य करणारे नागरिक यांच्यातील हे सुंदर नातेच समाजातील खरी एकता आणि माणुसकी अधिक दृढ करते.








