फुले एज्युकेशन तर्फे ५९ वा. आंतरजातीय , सत्यशोधक विवाह मोफत संपन्न .
सचिन सरतापे | म्हसवड |
म्हसवड : . थोर समाजसुधारक महात्मा फुले यांची द्विशताब्दी जन्म वर्षानिमित्त आणि सत्यशोधक समाज 153 व्या स्थापनादिनानिमित फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाऊंडेशन पुणे चे बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे , रविवार दि.6 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 12.30 एम.के.मंगल कार्यालय ,राहुरी अहिल्यानगर येथे समाजसेवक किशोर बोरावके(अहिल्यानगर) यांचे सत्यशोधक विनीत बोरावके (माळी),डिप्लोमा आणि SE.MECH.इंजि. यांच्या सोबत चंद्रकांत पत्की (छत्रपती संभाजी नगर) यांची सत्यशोधिका विशाखा पत्की (ब्राह्मण), एम.कॉम या उच्चशिक्षितांचा महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेल्या पद्धतीने 59 वा आंतरजातीय सत्यशोधक विवाह समारंभ नातेवाईक आप्तेष्ट यांच्या साक्षीने मोठ्या दिमाखात लेखक रघुनाथ ढोक यांचे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवनचरित्र 200 ग्रंथ भेट देऊन संपन्न झाला.
महात्मा जोतीराव फुले चरित्र साधने व प्रकाशन समिती,महाराष्ट्र शासनाचे सदस्य व या संस्थेचे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक या सोहळ्याचे विधिकर्ते म्हणून नेहमी प्रमाणे महात्मा फुले यांच्या वेशभूषेत विधी कार्य पाडले. तर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे विश्वस्थ प्रा.सुदाम धाडगे हे महात्मा फुले रचित मंगलाष्टकाचे गायन केले. यावेळी वधू वर याना संस्थेचे वतीने सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र आणि थोर समाज सुधारक महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची फोटो फ्रेम जेष्ठ समाजसेविका सत्यशोधिका नीलिमा सोनावणे नाशिक यांचे शुभहस्ते देण्यात आली. तसेच हा सोहळा यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल वधू वरांचे आई वडील सुवर्णा किशोर बोरावके आणि लीना महेंद्र महाजन यांना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे वतीने विश्वस्थ प्रा.सुदाम धाडगे यांचे शुभहस्ते सन्मान पत्र देऊन सन्मान करण्यात आला.
विवाहप्रसंगी रघुनाथ ढोक यांनी प्रतिपादन केले की थोरसमाजसुधारक महात्मा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना करून 25 डिसेंबर 1873 रोजी पहिला आंतरजातीय विवाह लावला आणि आज 153 वर्षानंतर हा आंतरजातीय सत्यशोधक विवाह सोहळा पार पडत आहे याचे प्रमाण फार नगण्य आहे. परंतु आजच्या काळात नातेवाईक, आप्तेष्टाचे साक्षीने व संमतीने विवाह होणे तितकेच गरजेचे असून हा आदर्श बोरावके परिवाराने जपला आहे. वधु वराचे नाते कुटुंब आणि नातेवाईकां सोबत सलोख्याचे राहण्यासाठी सर्वांचे संमतीने विवाह घडावीत असे म्हणत पुढे ढोक म्हणाले की महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती निमित्त घरातील सर्व शुभ कार्य सत्यशोधक पद्धतीने पार पाडावेत असे आवाहन देखील सर्व उपस्थितांना करून हा सोहळा पूर्ण शांतपणे पाहिला या बद्दल संस्थेचे वतीने आभार मानले.
विवाह मंडपात वधू वर यांचे दोन्ही हातामध्ये भारताचे संविधान व महात्मा फुले समग्र वाड्मय घेऊन फुलांच्या पाय घड्यावरून पारंपारिक वाद्याचे गजरात आगमन करीत सुरुवातीला थोर समाजसुधारक महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर विनीत आणि विशाखा यांचे कडून 7 वचने घेत 7 फेरे नंतर पुर्ण एकमेकांची माहिती घेऊन
स्वखुशीने जीवनसाथी म्हणून स्वीकार करून निर्भय सत्यशोधक बनण्याची सर्वा समक्ष शपथ पत्र वाचून सही केली. शेवटी आभार किशोर बोरावके यांनी मानले तर मोलाचे सहकार्य फोटोग्राफर किशोर गोगरे ,विशाल बोरावके यांनी केले.








