श्री. प्रतापराव पाटील यांच्या हस्ते शेतकरी बांधवांना बैलपोळा साजाचे उत्साहात वाटप
निलेश सोनवणे | प्रतिनिधी जळगाव |
बैलपोळा सणाच्या पार्श्वभूमीवर ममुराबाद येथे शेतकरी बांधवांच्या आनंदात सहभागी होत बैल पोळ्यासाठी आवश्यक साजाचे उत्साहात वाटप करण्यात आले. श्री. प्रतापराव पाटील यांच्या शुभहस्ते शेतकरी बांधवांना बैलपोळा साजाचे वितरण करण्यात आले.
शेतकऱ्याच्या जीवनात बैलपोळा या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वर्षभर शेतीच्या कामात शेतकऱ्याला साथ देणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ही पारंपरिक पद्धत आहे. या परंपरेचे जतन करत शेतकरी बांधवांचा सणाचा आनंद अधिक द्विगुणित व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
बैलपोळ्याच्या दिवशी शेतकरी आपल्या बैलजोडीला आकर्षक पद्धतीने सजवितात. त्यासाठी विविध प्रकारचे साज, साहित्य व सजावटीच्या वस्तूंची आवश्यकता असते. शेतकऱ्यांच्या या आनंदात आपलाही सहभाग असावा आणि त्यांच्या सुख-दुःखात सदैव सोबत राहावे, या भावनेतून साज वाटपाचा उपक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी शेतकरी बांधवांना बैलपोळा सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. शेतकरी सुखी, समृद्ध व आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा, त्याच्या कष्टाला योग्य मोबदला मिळावा आणि शेती व्यवसायाला अधिक बळ मिळावे, अशा सदिच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
मान्यवरांसह ग्रामस्थांची मोठी उपस्थिती
या कार्यक्रमास ममुराबादचे उपसरपंच विलास सोनावणे, गावातील युवा नेते राहुलभाऊ ढाके यांच्यासह गावातील प्रमुख मान्यवर, ज्येष्ठ नागरिक, युवा कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैलपोळ्याच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले.








