कै.मष्णाजीराव निलमवार यांच्या १४ व्या पुण्यतिथीनिमित्त नगरपरिषदेत सर्वपक्षीय अभिवादन
देगलूर ता. प्रतिनिधी/ संघपाल मदने
देगलूर येथील कै. मष्णाजीराव निलमवार यांच्या १४ व्या पुण्यतिथीनिमित्त देगलूर नगर परिषदेत सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि देगलूर शहरातील नागरिकांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम भावपूर्ण वातावरणात पार पडला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी लोकनेते कै. मष्णाजीराव निलमवार यांच्या राजकीय, सामाजिक आणि सार्वजनिक जीवनातील कार्याला उजाळा देत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. अनेक वक्त्यांनी आपल्या मनोगतातून निलमवार साहेब हे खऱ्या अर्थाने जनतेचे नेते होते,असे सांगितले. देगलूरच्या शहरवासीयांनी त्यांना दिलेली ‘लोकनेते’ ही पदवी त्यांच्या कार्याची खरी ओळख असल्याचेही वक्त्यांनी नमूद केले.
समाजवादी विचारसरणीवर निष्ठा ठेवून सर्व जाती-धर्मातील नागरिकांना सोबत घेऊन चालणारे नेतृत्व म्हणून कै. मष्णाजीराव निलमवार यांची ओळख होती. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर राहून शहराच्या विकासासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले. त्यांच्यासारखा सर्वसमावेशक आणि जनतेशी नाळ जोडलेला नेता पुन्हा देगलूरच्या मातीत होणे कठीण असल्याच्या भावना यावेळी अनेक मान्यवरांनी व्यक्त केल्या.
एका सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या कै. मष्णाजीराव निलमवार यांच्यामध्ये शहराच्या विकासासाठी काहीही करण्याची तळमळ होती. महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांना सामाजिक कार्याची आवड होती. कोणताही कौटुंबिक राजकीय वारसा नसताना त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर समाजसेवेत आणि राजकारणात वेगळी ओळख निर्माण केली.
महाराष्ट्राच्या इतिहासात देगलूर नगर परिषदेच्या शासकीय इमारतीत नगराध्यक्ष म्हणून एकमेव नेत्याचा पुतळा बसविण्यात आल्याने , लोकनेत्यांनी आपलं अख्ख जीवन गोरगरीब जनतेसाठी अर्पण केल्याची पावती असल्याचेही यावेळी लोकसभेचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी आपल्या अध्यक्ष पर भाषणात सांगितले.त्यांच्या कार्यकाळातील लोकाभिमुख निर्णय आणि शहराच्या विकासासाठी केलेले प्रयत्न आजही नागरिकांच्या स्मरणात असल्याचे खासदारांनी नमूद केले.
यावेळी देगलूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रतिनिधी बालाजी टेकाळे यांनी आपल्या भाषणात कै. मष्णाजीराव निलमवार हे आपले राजकीय गुरू असल्याची भावना व्यक्त केली. महाविद्यालयीन जीवनापासूनच आम्ही निलमवार साहेबांच्या सहवासात होतो. त्यांच्याकडून राजकारणाची प्रेरणा मिळाली तसेच सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची शिकवण मिळाली, असे सांगत त्यांनी आपल्या राजकीय गुरूंना भावपूर्ण अभिवादन केले.
या अभिवादन कार्यक्रमाला नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रा. रवींद्र पाटील चव्हाण, माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर, देगलूर नगराध्यक्ष प्रतिनिधी बालाजी टेकाळे, उपनगराध्यक्ष अंकुश देसाई देगावकर, देगलूर उपविभागीय पोलीस अधिकारी वैभव पोपळघट, देगलूरचे पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड, माजी नगराध्यक्ष मोगलाजी अण्णा शिरशेटवार, काँग्रेसचे वरिष्ठ नेते रामदास पाटील सुमठाणकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रमेश देशमुख शिळवणीकर, पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजी देशाई बळेगावकर, माजी उपनगराध्यक्ष बालाजी रोयलावार, माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार, माजी उपनगराध्यक्ष अविनाश निलमवार, काँग्रेसचे गटनेते मिरामोदिन, नगरसेवक हॉफिस साहब, नगरसेवक अनिल बोनलावार, नगरसेवक सुमंत कांबळे, शिवसेनेचे नेते महेश पाटील, माजी उपनगराध्यक्ष धोंडीबा कांबळे, माजी नगरसेवक वाय.जी. सोनकांबळे, यांच्यासह सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, काँग्रेस पक्षाचे नगरसेवक, सर्व पक्षीय माजी नगर सेवक, माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य,विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








