अँटी रॅगिंग मुक्त परिसर,सुरक्षित भविष्याचा संदेश
श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालयात अँटी रॅगिंग जनजागृती कार्यक्रम
सचिन सरतापे
म्हसवड : श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालय, म्हसवड येथे “अँटी रॅगिंग मुक्त परिसर, सुरक्षित भविष्य” या संकल्पनेअंतर्गत अँटी रॅगिंग जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी महाविद्यालयाच्या अँटी रॅगिंग मुक्त परिसर उपक्रमाचे उद्घाटन श्रीमंत गोविंदराजे राजेमाने यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास काकडे होते. त्यांनी प्रमुख पाहुणे श्रीमंत गोविंदराजे राजेमाने यांचे स्वागत केले. कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. पवार आर. जी. यांनी केली.
यावेळी मार्गदर्शन करताना श्रीमंत गोविंदराजे राजेमाने म्हणाले, “रॅगिंग हा गुन्हा आहे. रॅगिंगमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत नाही, उलट त्यांना मानसिक त्रास तसेच शारीरिक इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने एकमेकांचा आदर करावा आणि मैत्रीचे नाते जपावे.”
रॅगिंग करणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई होऊ शकते. भारतीय दंड संहितेतील संबंधित कलमांसह लागू असलेल्या कायदेशीर तरतुदींनुसार कारवाई केली जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. विद्यार्थ्यांनी रॅगिंगला ठामपणे “नाही” म्हणत महाविद्यालयाचा परिसर सुरक्षित, भयमुक्त आणि मैत्रीपूर्ण ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमास अँटी रॅगिंग समितीचे प्रमुख डॉ. माने पी. ए., प्रा. माने ए. आर., प्रा. पवार आर. जी., आयक्यूएसी प्रमुख प्रा. रणवरे डी. जी., प्रा. मोरे तसेच माजी विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष विजय माने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रा. माने ए. आर. यांनी मानले. विद्यार्थ्यांमध्ये रॅगिंगविरोधी जनजागृती निर्माण करून सुरक्षित व सकारात्मक शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.








