येवला तालुक्यात चोऱ्यांचे सत्र; ग्रामीण पोलिसांचे संख्याबळ वाढवा
पेट्रोलिंगसाठी पाच बीटला पाच गाड्यांची गरज, प्रत्यक्षात एकच जुनी गाडी; शिवसेनेचे युवा नेते कुणाल दराडे यांचे ग्रामीण पोलिसांना निवेदन
लक्ष्मण घुगे / राजापूर प्रतिनिधी
दिनांक १० सप्टेंबर २६ : येवला तालुक्याच्या ग्रामीण भागात चोऱ्यांच्या वाढत्या घटनांमुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांचे अपुरे मनुष्यबळ आणि रात्रीच्या पेट्रोलिंगचा अभाव चोरट्यांच्या पथ्यावर पडत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. ग्रामीण भागातील पोलिसांचे संख्याबळ तातडीने वाढवून नियमित रात्रीचे पेट्रोलिंग सुरू करावे, तसेच बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करावेत, या प्रमुख मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने ग्रामीण पोलिस ठाण्यात नुकतेच निवेदन देण्यात आले. शिवसेनेचे युवा नेते कुणाल दराडे यांनी वाढत्या चोऱ्यांवर तातडीने कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली.
तालुक्यातील विखरणी, कातरणी, उंदीरवाडी यांसह ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये अलीकडच्या काळात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या घरातून सोन्याचे दागिने चोरीस गेले असून, एका घटनेत तब्बल ११ तोळे सोने चोरट्यांनी लंपास केल्याचे सांगण्यात आले. तर काही कुटुंबांनी भविष्यासाठी साठवून ठेवलेली लाखो रुपयांची रक्कमही चोरीला गेली आहे. एकीकडे पावसाअभावी शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला असताना दुसरीकडे चोरट्यांच्या धुमाकुळामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची चिंता वाढली आहे.
पाच बीट; मात्र पेट्रोलिंगसाठी एकच गाडी
तालुक्यात ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षेत्रात नियमानुसार पाच बीट असून, प्रत्येक बीटसाठी स्वतंत्र वाहन उपलब्ध असणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात पेट्रोलिंगसाठी केवळ एकच जुनी गाडी उपलब्ध असल्याचा दावा निवेदनातून करण्यात आला आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी ग्रामीण भागातील सर्व गावांमध्ये प्रभावी गस्त घालणे पोलिसांना शक्य होत नसल्याने चोरट्यांचे मनोबल वाढत असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.
नवनियुक्त पोलिस निरीक्षक शिंदे यांनी ग्रामीण भागातील वाढत्या चोरीच्या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन पोलिस पेट्रोलिंग वाढवावे, संशयितांवर लक्ष ठेवावे आणि चोरीच्या प्रकरणांचा तपास गतिमान करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
वीजपुरवठ्याच्या नियोजनाचीही मागणी
ग्रामीण भागात वारंवार होणारे वीजपुरवठ्याचे शटडाऊन आणि त्याचे निश्चित वेळापत्रक नसल्याने रात्रीच्या वेळी अनेक गावांमध्ये अंधाराचे साम्राज्य निर्माण होते. याचा गैरफायदा चोरटे घेत असल्याचा मुद्दाही निवेदनात मांडण्यात आला. महावितरणने वीजपुरवठ्याचे योग्य नियोजन करून शटडाऊनची माहिती नागरिकांना पूर्वकल्पनेने द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
प्रशासनातील विविध विभागांचा समन्वय आवश्यक
चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी केवळ पोलिसांवर अवलंबून न राहता महसूल, पंचायत, ग्रामविकास आणि वीज विभागाने समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे दराडे यांनी सांगितले. तहसीलदार, प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, पोलिस पाटील, पोलिस अधिकारी आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्थेबाबत ठोस कृती आराखडा तयार करावा, अशी मागणी करण्यात आली.
ग्रामरक्षक दल सक्रिय करण्याची मागणी
गावागावांमध्ये ग्रामरक्षक दलाची यंत्रणा अधिक प्रभावी करून ती सक्रिय करावी, अशी मागणीही करण्यात आली. गावातील तरुणांना संघटित करून रात्रीच्या वेळी संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ग्रामरक्षक दलाला आवश्यक मार्गदर्शन व समन्वय देण्यात यावा. पोलिस आणि ग्रामस्थ यांच्यातील समन्वयातूनच ग्रामीण भागातील चोऱ्यांवर प्रभावी नियंत्रण मिळवता येईल, असा सूर निवेदनातून व्यक्त करण्यात आला.
बंद सीसीटीव्ही तातडीने सुरू करा
ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींनी बसविलेले अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने चोरीच्या घटनांच्या तपासात अडथळे येत आहेत. त्यामुळे गावातील प्रवेशद्वार, मुख्य चौक, बाजारपेठ, शाळा, मंदिरे तसेच महत्त्वाच्या ठिकाणी असलेले बंद सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करावेत, अशी मागणी करण्यात आली. पेट्रोल पंपचालक, हॉटेल व्यावसायिक आणि नागरिकांनीही आपल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जतन करून चोरीच्या घटनांच्या तपासात पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
पोलिसांना शिवसैनिकांचे सहकार्य
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना ज्या ठिकाणी नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता भासेल, त्या ठिकाणी गावागावातील शिवसैनिक तसेच कुणाल दराडे फाउंडेशनचे कार्यकर्ते प्रशासनाला सहकार्य करण्यास तयार असल्याची ग्वाही यावेळी देण्यात आली. वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती दूर करण्यासाठी पोलिस प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली.








