राहुल पटारे यांचे सभासदत्व रद्द करण्याची मागणी फेटाळली
१० आरची अट पूर्ण असल्याने सहाय्यक निबंधकांकडून तक्रार अर्ज निकाली
टाकळीभान प्रतिनिधी / संदीप जाधव
टाकळीभान : श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे संचालक तथा विद्यमान चेअरमन राहुल आप्पासाहेब पटारे यांचे सभासदत्व रद्द करून त्यांना संचालक पदासाठी अपात्र ठरविण्याची मागणी करणारा तक्रार अर्ज सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, श्रीरामपूर नामदेव ठोंबळ यांनी निकाली काढला आहे.
टाकळीभान येथील संजय संपत रणनवरे यांनी ८ जुलै २०२६ रोजी तक्रार दाखल केली होती. पटारे यांच्या नावावर
संस्थेच्या कार्यक्षेत्रात उपविधीनुसार आवश्यक असलेली किमान १० आर कृषी जमीन नसल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला होता. काही महसुली अभिलेखांमध्ये जमीन अकृषिक असल्याची नोंद असल्याचेही तक्रारीत नमूद करून सभासदत्वाची पात्रता तपासण्याची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणी सहाय्यक निबंधक कार्यालयाने संस्थेचे सचिव व राहुल पटारे यांना म्हणणे मांडण्याची संधी दिली. संस्थेच्या सचिवांनी सादर केलेल्या कागदपत्रांनुसार, पटारे हे संस्थेचे जुने सभासद असून त्यांच्या नावावर २० हजार रुपयांचे शेअर्स
आहेत. तसेच टाकळीभान शिवारातील गट क्रमांक ४३५ मध्ये त्यांच्या नावावर २० आर जमीन असल्याची माहिती खरेदीखताद्वारे संस्थेला देण्यात आली होती. या जमिनीवर ऊस पिकासाठी संस्थेने त्यांना ३५ हजार रुपयांचे कर्जही वितरित केले आहे. उपलब्ध कागदपत्रे व दोन्ही बाजूंचे म्हणणे तपासल्यानंतर पटारे यांनी संस्थेच्या उपविधी क्र. ६ (३) मधील किमान १० आर जमीनधारणेची अट पूर्ण केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांचे सभासदत्व रद्द करण्याची मागणी ग्राह्य धरता येत नसल्याचे नमूद करत सहाय्यक निबंधकांनी तक्रार अर्ज निकाली काढला.








