*दुष्काळाच्या सावटात सरज्या राजाचा पोळा साजरा..*
*खरीप पिकांची अवस्था बिकट;शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता,मात्र बैलांप्रती कृतज्ञतेची भावना कायम*
लक्ष्मण घुगे राजापूर प्रतिनिधी
:यंदाच्या खरीप हंगामात अत्यल्प पाऊस झाल्याने येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भागातील खरीप पिकांची अवस्था बिकट झाली आहे. ऐन वाढीच्या अवस्थेत पावसाने दडी मारल्याने बाजरी, मूग, मका,सोयाबीन,भुईमूग, तूर तसेच भाजीपाला आदी पिके करपली आहेत. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांवर नापिकीचे संकट ओढवले आहे.
दुष्काळी परिस्थिती आणि खरीप हंगामातील नापिकीचे सावट यंदाच्या बैलपोळ्यावरही स्पष्टपणे जाणवले. सणाचा उत्साह काहीसा कमी असला तरी, वर्षभर शेतकऱ्यांसोबत राबणाऱ्या बैलांप्रती असलेली कृतज्ञता आणि जिव्हाळा मात्र कायम राहिला. शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या‘सरज्या राजा’ची सजावट करून त्याची पूजा केली आणि पारंपरिक पद्धतीने पोळा साजरा केला.
शेतकऱ्याच्या सुख-दुःखात कायम साथ देणाऱ्या बैलाच्या श्रमांचे महत्त्व यानिमित्ताने अधोरेखित झाले. पिके हातची गेल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत असला,तरी काळ्या आईची सेवा करणाऱ्या या मुक्या जीवाप्रती असलेले प्रेम त्याने पोळ्याच्या माध्यमातून व्यक्त केले.त्यामुळे नैराश्याच्या वातावरणातही‘सरज्या राजा’चा पोळा श्रद्धा, कृतज्ञता आणि मायेने साजरा झाला.नगरसूल येथील पाटील घराण्याला पारंपरिक बैल पोळ्याचा बैलांना मान असल्यामुळे दहा वर्षाच्या शंभू अमित पाटील यांच्या हस्ते गावच्या वेशीत श्रीफळ वाढवूनू बैल पोळा भरविण्यात आला.
“यंदा पाऊस अत्यल्प झाल्याने दुष्काळाचे सावट आहे.खरीप पिकांची अवस्था बिकट असली.तरी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा आम्ही जपतो.पोळ्याच्या निमित्ताने बैलांची पूजा करून त्यांच्याप्रती ऋण व्यक्त केले.शेतकऱ्याच्या सुख-दुःखात साथ देणारा मुका जीव आमचा सहकारी आहे.”
— विनोद पाटील,शेतकरी नगरसूल.








