अभिजित दीपके यांच्या दौऱ्यात गडचिरोली तील शिक्षण व्यवस्थेची पोलखोल
‘स्कूल ठीक करो’ अभियानाची गडचिरोलीतून सुरुवात; दुर्गम भागातील शाळांची पाहणी
चुन्नीलाल मोटघरे| एटापल्ली गडचिरोली
१९ सप्टेंबर : गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील शिक्षण व्यवस्थेची विदारक वस्तुस्थिती समोर आणण्यासाठी CJP संस्थापक अभिजित दीपके यांच्या गडचिरोली जिल्हा दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांच्या दौऱ्यादरम्यान एटापल्ली तालुक्यातील दुम्मे, कोसा-आलेंगा, कोहका आणि पैडी येथील शाळांना भेट देऊन शैक्षणिक परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
या पाहणीदरम्यान विद्यार्थ्यांशी, शिक्षकांशी तसेच पालकांशी संवाद साधून शाळांमध्ये भेडसावणाऱ्या विविध समस्या जाणून घेण्यात आल्या. काही समस्या तातडीने संबंधित विस्तार अधिकारी आणि गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या (BEO) निदर्शनास आणून देत त्या सोडविण्याची मागणी दीपके यांनी दूरध्वनीद्वारे केली.
गडचिरोलीतून ‘स्कूल ठीक करो’ अभियानाला सुरुवात-
गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यातील मुलांना शिक्षणाच्या मूलभूत सुविधा आणि समान संधी मिळाव्यात, या उद्देशाने ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची सुरुवात गडचिरोलीतून करण्यात आली.
दुर्गम भागातील शाळांची प्रत्यक्ष पाहणी करून केवळ कागदोपत्री आकडेवारीवर अवलंबून न राहता शाळेतील वास्तविक परिस्थिती समजून घेणे आणि प्रशासनाकडून त्यावर ठोस कार्यवाही करून घेणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे अभिजित दीपके यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील प्रश्नांचा डेटा सादर करण्याची आझाद समाज पार्टीची तयारी-
या दौऱ्यात आझाद समाज पार्टी गडचिरोलीचे जिल्हा प्रभारी विनोद मडावी यांनी दीपके यांना जिल्ह्यातील शिक्षण, आरोग्य आणि रोजगार क्षेत्रातील विविध प्रश्नांची माहिती दिली. आझाद समाज पार्टीकडून या विषयांवर सातत्याने काम केले जात असून जिल्ह्यातील उपलब्ध डेटा आणि वस्तुनिष्ठ माहिती CJP समोर सादर करण्यात येईल, असे मडावी यांनी सांगितले.
त्यावर अभिजित दीपके यांनी उपलब्ध माहितीच्या आधारे या प्रश्नांवर काम करण्याची ग्वाही दिली.
या दौऱ्यात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सहसचिव सचिन मोटकूलवार, सुरज जक्कुलवार, CJPचे पदाधिकारी, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते तसेच पत्रकार उपस्थित होते.
तरुण आणि कार्यकर्त्यांची भेटीची अपेक्षा; वेळेअभावी नाराजी–
दरम्यान, अभिजित दीपके यांच्या गडचिरोली आगमनाची माहिती मिळाल्यानंतर जिल्ह्यातील अनेक तरुण, सामाजिक कार्यकर्ते आणि समर्थक त्यांची भेट घेण्यासाठी उत्सुक होते. मात्र दिवसभराचा दौरा आणि शाळांच्या पाहणीचा व्यस्त कार्यक्रम यामुळे सर्वांना प्रत्यक्ष भेटणे शक्य होणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे काही कार्यकर्ते आणि दीपके यांना भेटण्यास उत्सुक असलेल्या तरुणांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून आले.
गडचिरोलीतील दुर्गम भागातील शिक्षण व्यवस्थेतील प्रश्न थेट प्रशासनासमोर आणून त्यावर कार्यवाही करण्याच्या दृष्टीने ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची सुरुवात महत्त्वपूर्ण ठरणार का, याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
—








