भोकर येथे मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
बातमी सम्राट | .निलेश सोनवणे | जळगांव जिल्हा प्रतिनिधी | दि.२३/०९/२६/
जळगाव : जळगाव तालुक्यातील भोकर येथे दिनांक २१ सप्टेंबर २०२६ रोजी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, भोकर येथे मोफत नेत्र तपासणी, मोतिबिंदू चिकित्सा व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन प्रा.भाऊसाहेब सोनवणे यांच्याकडून करण्यात आले. या शिबिराला पंचक्रोशीतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून १०० पेक्षा अधिक रुग्णांनी ‘कांताई नेत्र संजीवनी योजना’चा लाभ घेतला.
शिबिरात आलेल्या रुग्णांची तज्ज्ञांकडून नेत्र तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर मोतिबिंदू शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या २४ रुग्णांना पुढील उपचारासाठी जळगाव येथील कांताई नेत्रालयात पाठविण्यात आले. त्यापैकी ८ रुग्णांवर मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली, तर उर्वरित रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी पुढील तारीख देण्यात आली आहे.
गेल्या पाच वर्षांपासून प्रा. भाऊसाहेब सुकदेव सोनवणे यांच्या पुढाकारातून पंचक्रोशीतील गरजू नागरिकांसाठी विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या माध्यमातून आतापर्यंत हजारो रुग्णांना विविध आजारांवरील उपचार व आरोग्यसेवेचा लाभ मिळाला आहे.
यापुढेही पंचक्रोशीतील नागरिकांना आरोग्यविषयक कोणतीही समस्या किंवा व्याधी असल्यास त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजक प्रा. भाऊसाहेब सुकदेव सोनवणे, उप जिल्हाप्रमुख, जळगाव जिल्हा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी मो. ९५६१८२०८५९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची गरज लक्षात घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे पंचक्रोशीतील नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून, गरजू रुग्णांसाठी मोफत आरोग्यसेवेचे हे पाऊल कौतुकास्पद ठरत आहे.
शिबिर यशस्वी करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उप तालुका प्रमुख अशोक पाटील, प्रभाकर कोळी, नंदलाल सोनवणे, दिलीप भागो बाविस्कर, हरीश पवार, दिलीप पवार, किशोर पवार, शिवसेना शाखाप्रमुख लोटन सोनवणे, संदीप पाटील, सुकदेव बाविस्कर, योगेश कोळी, धनराज वारडे, समाधान वाघ, विलास सोनवणे व एकनाथ सैंदाने यांनी परिश्रम घेतले.








