पुणे प्रतिनिधी | एस.एन.नांदेडकर
‘आम्ही भारताचे लोक – आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ (महाराष्ट्र राज्य)’ च्या संघटनात्मक कामकाजात अधिक पारदर्शकता, सक्रियता आणि कार्यक्षमता आणण्याच्या उद्देशाने मोठी पुनर्रचना करण्यात आली आहे. चळवळीचे मुख्य समन्वयक संदेश शालिनी संभाजी कर्डक यांनी जुनी ‘कोअर टीम’ बरखास्त करून तिच्या जागी नवीन ६ सदस्यीय ‘राज्य नियोजन समिती’ स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या समितीमध्ये आयु. सुकलाल पाटील,लेखिका कवयित्री आयु. स्वाती चव्हाण, विदर्भ कवयित्री आयु. रिता रामटेके, आयु. शुभांगी गुरचळ , कवी आयु.अंकुश सोनवणे आणि प्राचार्य आयु.संघशिल भद्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नव्याने गठित झालेली राज्य नियोजन समिती राज्यस्तरीय नियोजन, संघटनात्मक समन्वय, उपक्रमांची आखणी आणि सर्व जिल्हा समन्वयकांशी नियमित संवाद साधण्याचे काम पाहणार आहे. याशिवाय, चळवळीत पदाधिकाऱ्यांच्या कामाचे ऑडिट करणे अनिवार्य करण्यात आले असून, पुढील १५ दिवसांत सर्व कार्यरत पदाधिकाऱ्यांच्या कामाचा सविस्तर आणि वस्तुनिष्ठ आढावा घेतला जाईल. या आढाव्यात निष्क्रिय आढळणाऱ्या किंवा जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरणाऱ्या पदाधिकाऱ्यांना सुधारणेची संधी देऊनही बदल न झाल्यास त्यांच्या जागी नवीन सक्षम सदस्यांना संधी दिली जाईल. समितीला उपक्रम नियोजन, तक्रार निवारण आणि आर्थिक व्यवहारांवर देखरेख ठेवण्याचे अधिकार असतील, मात्र अंतिम धोरणात्मक निर्णय मुख्य समन्वयकांच्या सहमतीनेच घेतले जातील.
या फेरबदलाबाबत बोलताना मुख्य समन्वयक संदेश शालिनी संभाजी कर्डक यांनी सांगितले की, पद म्हणजे केवळ प्रतिष्ठा नसून ती एक जबाबदारी आहे आणि प्रत्येकाला कामाच्या आधारे आपली उपयुक्तता सिद्ध करावी लागेल. “चळवळ ही कोणत्याही एका व्यक्तीची किंवा समूहाची मालमत्ता नसून ती समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि संविधानिक मूल्यांवर उभी असलेली सामूहिक चळवळ आहे,” असे सांगत त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना सामूहिक जबाबदारीने व समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले आहे.








