जोर्वे (ता. संगमनेर) : ज्या पवित्र येवला भूमीत विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी “मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही” अशी धर्मांतराची सिंहगर्जना केली होती, त्याच पवित्र भूमितून धम्माची दीक्षा घेऊन श्रामणेर बनलेले जोर्वे गावचे सुपुत्र आयु. सचिन मोकळ नुकतेच गावी परतले. जोर्वे गावच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या युवकाने बौद्ध धम्माचा चीवर धारण करून श्रामणेर होण्याचा मान मिळवला आहे.
या ऐतिहासिक घटनेचे औचित्य साधून अश्विन पौर्णिमा (कोजागिरी पौर्णिमा) या अत्यंत पवित्र दिनी बौद्ध उपासक, उपासिका व बालसंघ यांच्या वतीने सचिन मोकळे यांचा भव्य जाहीर सत्कार करण्यात आला.
बौद्ध धम्मामध्ये अश्विन पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्व आहे. तीन महिन्यांच्या वर्षावासानंतर भिक्खू संघ एकत्र येऊन धम्मावर चिंतन करतो आणि याच दिवसापासून धम्म प्रचार आणि प्रसाराच्या कार्याला नव्याने सुरुवात करतो. अशा पवित्र दिनी जोर्वे गावातून एका श्रामणेराचा उदय होणे, हा खऱ्या अर्थाने धम्माच्या पुनरुत्थानाचा क्षण मानला जात आहे.
यावेळी श्रामणेर सचिन मोकळ यांनी उपस्थित उपासक-उपासिकांसाठी बौद्ध धम्मावर अत्यंत प्रबोधनात्मक कीर्तन/धम्म देसना दिली. त्यांच्या मुखातून बुद्ध व बाबासाहेबांचे विचार ऐकून उपस्थितांचे डोळे पाणावले.
या कार्यक्रमास आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते *पँथर माणिकराव यादव*, अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस (अनुसूचित जाती विभाग) जिल्हाध्यक्ष *बंटी यादव*, भीमराव चव्हाण, दिलीपराव यादव, विश्वासराव चव्हाण, रावसाहेब यादव, बाळासाहेब कोळगे, संदीप यादव, अलकाबाई चव्हाण, बबई गायकवाड, सीताबाई यादव, माया रुपवते आदींसह मोठ्या संख्येने बौद्ध उपासक-उपासिका उपस्थित होते.
*एक युवक चीवर घेतो तेव्हा फक्त कुटुंबाचा नाही तर संपूर्ण गावाचा उद्धार होतो. सचिनने टाकलेले हे पाऊल जोर्वे गावातील पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल,* अशी भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली.
सचिन मोकळ यांना पुढील धम्म वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!








