आष्टी ( दिगंबर बोडखे ):- शेती करण्यापेक्षा शेतीला जोडव्यवसाय केला तर अधिक फायदेशीर ठरत आहे. कोणताही व्यवसाय जिद्द आणि चिकाटीने केला तर तो निश्चित परवडतो याचेच उदाहरण म्हणजे कडा येथील मोहन मारुती कर्डिले व त्यांचा मुलागा योगेश कर्डीले यांचे आहे. त्यांनी पाच वर्षांपूर्वी पाच गाईंवर सुरू केलेला मुक्त गोठा व्यवसाय आज त्यामध्ये दहा पटीने वाढ झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अधिक माहिती अशी की, कोणतेही काम करताना मनापासून केले तर निश्चित फायदा होतो. मोहन कर्डीले यांनी अर्धा ते पाऊण एकर क्षेत्राला तार कंपाऊंड केले आहे, त्यामध्ये शेड उभारून गाईकरीता निवारा तयार केला आहे. आज मुक्त गोठ्यात 42 गाई व 9 कालवडी आहेत. गाईचे दुध काढण्यासाठी मशीनचा वापर केला जातो. दररोज साधारण 275 लिटर दूध डेअरीला जाते. या सर्व कामासाठी कुटुंबातील मोहन कर्डीले, सौ. नंदाबाई मोहन कर्डिले, मुलगा योगेश कर्डिले व सौ. कोमल योगेश कर्डिले यांच्याशिवाय दोन लेबरही काम करतात. सर्व गाईना नियमित मका, गिनी गवत, मुरघास, ऊस, गव्हाच्या काड्याचा भुसा याशिवाय जास्त प्रमाणात दुध मिळावे यासाठी नियमित पौष्टिक खाद्य दिले जाते. सर्व गाई टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांकडूनच खरेदी केलेल्या आहेत. यामध्ये जास्त करून बीटल जातीच्या आहेत असे मोहन कर्डीले यांनी सांगितले.
सर्व गाईना मिळून दररोज दीड ते दोन टन चारा लागतो. गाईसाठी लागणारा खुराक थेट कंपनीकडूनच खरेदी केला जातो, महिन्याकाठी 60 गोण्या लागतात थेट कंपनीतून खरेदी केल्यामुळे गोणीमागे साठ रुपयांची बचत होते.वर्षाकाठी सर्व गाईचे मिळून 70 ते 80 ट्रॅक्टर शेणखत जमा होते ते साधारण पाच ते सहा हजार रुपये ट्रॅक्टर प्रमाणे विक्री होते. याशिवाय घरच्या जमिनीला मनसोक्त शेणखत दिले जाते.
त्याचप्रमाणे शेतातून चारा आणण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर केला जातो. सौ. कोमल कर्डीले या स्वतः ट्रॅक्टर चालवतात.
उन्हाळा, पावसाळा व हिवाळा तिन्ही ऋतूमध्ये गाईची काळजी घेतली जाते विशेष करून उन्हाळ्यात गाईना उष्णतेपासून त्रास होऊ शकतो त्यामुळे शेडमध्ये फॅन सुविधा त्याचप्रमाणे वातावरण थंड राहावे उन्हाळ्यात पंखे आणि फोगर सिस्टीम बसविण्यात आली आहे तसेच संपूर्ण शेड सीसीटीव्हीच्या निगराणी खाली आहे.
घरातील सर्व सदस्य अहोरात्र परिश्रम घेतात,सर्व गाई दिवसभर मुक्त असतात आणि सकाळी, संध्याकाळी फक्त दुध काढण्याच्या वेळेस आणि चारा खाण्यासाठी थोडावेळ बांधल्या जातात. सायंकाळच्या व सकाळच्या वेळी आपोआप सर्व गाई धार काढण्यासाठी आपापल्या जागेवर येऊन थांबतात.महिन्याकाठी खाद्य,लेबर, तसेच डॉक्टर आणि औषधे सर्व खर्च जाऊन साधारण सव्वा ते दीड लाख रुपये महिन्याला नफा मिळतो असेही कर्डीले यांनी सांगितले.
सरकारने छावणीत नाहीतर दावणीला चारा द्यावा :- मोहन कर्डिले
यावर्षी पाऊसच झालेला नाही त्यामुळे चारा पाण्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. शेतकऱ्यांपुढे प्रचंड असे मोठे संकट उभे आहे, जनावरे कसे सांभाळायची याबाबत शेतकऱ्यांना चिंता लागली आहे. शासनाने छावण्या सुरू न करता प्रत्येक शेतकऱ्याला दावणीला चारा द्यावा अशी मागणी मोहन कर्डीले यांनी केली.
युवकांनी व्यावसायिक बनून नोकर नाही तर, मालक बनावे- योगेश कर्डीले
योगेश कर्डीले हा बी.एस्सी. बी. एड. असा उच्च शिक्षित असून तो एका फायनान्स कंपनीत चांगल्या पगारावर नोकरीस होता परंतु नोकर बनण्यापेक्षा मालक बनलेले कधीही चांगलेच या भावनेतून वडील मोहन कर्डीले यांनी पाच गाईवर सुरू केलेला व्यवसाय आज मोठ्या प्रमाणात विस्तारला आहे. युवकांनी नोकरीच्या मागे न लागता व्यावसायिक बनावे असे योगेश कर्डीले यांनी सांगितले.








