जळगांव जिल्हा प्रतिनिधी : श्री. निलेश सोनवणे
धरणगाव: बापूसाहेब आर. डी. पाटील माध्यमिक विद्यालय, पथराड,ता. धरणगाव.जि.जळगाव या विद्यालयातील शिपाई श्री. रविंद्र नानाजी पाटील यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल ‘महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार २०२६’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. दि.२५ ऑक्टोबर २०२६ रोजी शिर्डी येथे बी.दी चेंज फाउंडेशनच्या वतीने आयोजित विशेष सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या पुरस्कार सोहळ्यात प्रसिद्ध कलाकार मा. निवेदिता पगार व मा. अरुण उत्तमराव भंडारे साहेब यांच्या शुभहस्ते श्री. रविंद्र नानाजी पाटील यांना सन्मानित करण्यात आले.
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करणाऱ्या या सोहळ्यात श्री.रविंद्र नानाजी पाटील यांना मिळालेल्या सन्मानामुळे बापूसाहेब आर. डी. पाटील माध्यमिक विद्यालय , पथराड तसेच परिसरात नावलौकिकात भर पडली आहे. त्यांच्या या यशामुळे विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंदामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
“कर्तृत्वाला सन्मानाची जोड मिळाली की, कार्य करण्याची प्रेरणा अधिक बळकट होते. समाजासाठी केलेल्या प्रामाणिक कार्याची पोचपावती म्हणजे हा पुरस्कार होय,” अशा भावना व्यक्त करत सहकारी व हितचिंतकांनी श्री.रविंद्र नानाजी पाटील यांचे अभिनंदन केले.
या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मित्रपरिवार व हितचिंतकांकडून श्री. रविंद्र नानाजी पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील शैक्षणिक व सामाजिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.








