टेंभुर्णी पत्रकार अमोल मदने
उजनी धरण परिसरात प्रस्तावित असलेला एआय डेटा सेंटर आणि सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी घेतली आहे. रांजणी येथे पार पडलेल्या नियोजन आढावा बैठकीत ते बोलत होते.
उजनी धरण हे सोलापूर, पुणे, अहिल्यानगर जिल्ह्याच्या शेती आणि पिण्याच्या पाण्याची जीवनदायिनी आहे. या धरणाच्या बुडित क्षेत्रात आणि परिसरात हजारो एकर जमीन घेऊन एआय डेटा पार्क उभारण्याचा घाट शासनाकडून घातला जात आहे. हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारा असून, शेतकऱ्यांच्या पाण्यावर डल्ला मारण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला.
दि. 31 ऑक्टोबरला रस्ता रोको –या प्रकल्पाला तात्काळ स्थगिती न दिल्यास 31 ऑक्टोबर रोजी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भव्य रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येणार आहे. या आंदोलनात उजनी लाभक्षेत्रातील हजारो शेतकरी सहभागी होणार आहेत.
*शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती -*
यावेळी झालेल्या बैठकीत विविध पक्षाचे नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लढाई शेवटपर्यंत लढू, मागे हटणार नाही, असा निर्धार यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
या लढ्यात सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन खासदार मोहिते-पाटील यांनी केले आहे.








