स्वातंत्र्यदिनानिमित्त कॅनरा बँकेकडून गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
देवगाव : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कॅनरा बँक, संगमनेर शाखेच्या वतीने डॉ. अण्णासाहेब शिंदे विद्यालय, देवगाव येथील इयत्ता ५ वी ते १० वीतील मागासवर्गीय प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्या ज्योती शिष्यवृत्ती’ प्रदान करण्यात आली.
या शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली असून, यावेळी विद्यार्थ्यांना पासबुकचे वितरणही करण्यात आले. शिष्यवृत्तीचा लाभ मिळालेल्या विद्यार्थ्यांमध्ये आरोही सुरेश रोहम (इयत्ता ५ वी) ₹३,०००, श्रद्धा गौतम पवार (इयत्ता ६ वी) ₹३,०००, ऋतुजा नितीन ठोंबरे (इयत्ता ७ वी) ₹३,०००, दिव्या गोरख पवार (इयत्ता ८ वी) ₹५,०००, शीतल गोवर्धन माळी (इयत्ता ९ वी) ₹५,००० आणि नयन विनोद पवार (इयत्ता १० वी) ₹५,००० यांचा समावेश आहे.
शिष्यवृत्ती व पासबुक वितरणाचा कार्यक्रम कॅनरा बँक, संगमनेर शाखेचे सहायक व्यवस्थापक हर्षल ठाकरे तसेच बँक कर्मचारी समीर फाफाळे व विजय कासार यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाबद्दल कॅनरा बँकेचे आभार मानले. तसेच शिष्यवृत्तीचा लाभ विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी बँकेच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून विशेष सहकार्य करणारे तुषार पानसरे यांचेही विशेष अभिनंदन करून आभार व्यक्त करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देतानाच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक पाठबळ देणारा कॅनरा बँकेचा हा उपक्रम कौतुकास्पद व प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
“शिक्षणाला मिळालेली मदत म्हणजे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याला मिळालेली नवी दिशा…!”








