हळदा येथे अर्धवट नाली बांधकामामुळे नागरिकांचे आरोग्य व सुरक्षितता धोक्यात
काम पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा कॉम्रेड विनोद झोडगे यांनी इशारा देताच दुसऱ्या दिवशी काम सुरू
प्रतिनिधी : चुन्नीलाल मोटघरे
हळदा (ब्रह्मपुरी): ब्रह्मपुरी तालुक्यातील गांगलवाडी ते व्याहाड या मुख्य रस्त्याचे बांधकाम गेल्या दोन वर्षांपासून सुरू असून संबंधित यंत्रणा व ठेकेदाराच्या संथ व नियोजनशून्य कारभारामुळे स्थानिक नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या रस्त्यावरील दाट लोकवस्ती असलेल्या मौजा हळदा गावात अर्धवट सोडून दिलेल्या नाली बांधकामामुळे गावात मोठ्या अपघाताची आणि आरोग्याच्या गंभीर समस्येची भीती निर्माण झाली आहे.
गेल्या उन्हाळ्यात गावातील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या नाल्यांचे बांधकाम हाती घेण्यात आले होते. मात्र, बसस्टॉप परिसरातील नालीचे बांधकाम ठेकेदाराने अर्धवट स्थितीत सोडले आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने या उघड्या व अर्धवट नालीत मोठ्या प्रमाणावर सांडपाणी व पावसाचे पाणी तुंबले आहे. काही दिवसांपूर्वीच एक लहान मुलगा या खोल नालीत पडला होता; सुदैवाने नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आणि बालकाचा जीव वाचला.
पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन सांडपाण्यात; साथीच्या रोगांची भीती या उघड्या नालीवर स्लॅब टाकण्याची मागणी गावकऱ्यांनी वारंवार ठेकेदाराकडे केली, परंतु त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे, याच सांडपाणी साचलेल्या उघड्या नालीतून गावातील पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली आहे. यामुळे पिण्याचे पाणी दूषित होऊन गावात कॉलरा, गॅस्ट्रो, डेंग्यूसारख्या साथीच्या आजारांचा फैलाव होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
दोन दिवसांत काम पूर्ण करा, अन्यथा आंदोलन चा इशारा देताच काम सुरू!
प्रशासनाच्या आणि ठेकेदाराच्या या निष्काळजीपणाविरोधात संतप्त गावकऱ्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड विनोद झोडगे यांच्याकडे दाद मागितली. या तक्रारीची दखल घेत कॉम्रेड झोडगे यांनी १७ ऑगस्ट रोजी हळदा गावाला प्रत्यक्ष भेट देऊन रस्ता व अर्धवट नाली बांधकामाची पाहणी केली.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तातडीने संबंधित ठेकेदाराशी दूरध्वनीवरून संपर्क साधून तीव्र शब्दांत जाब विचारला. पुढील सात दिवसांत नालीवरील स्लॅबचे बांधकाम व उर्वरित काम पूर्ण करण्यात यावे; अन्यथा ग्रामस्थांना सोबत घेऊन तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा थेट इशारा कॉम्रेड विनोद झोडगे यांनी काल दिला होता .या तक्रारी ची तात्काळ दखल घेत रोडचे मुख्य ठेकेदार इंजिनिअर राजेश गौतम हे जातीने आपल्या देखरेकेखाली आज दिनांक 18 ऑगस्ट 2026 रोजी काम सुरू केले आहे.त्यामुळे हळदा येथील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे,सदरील बांधकाम पूर्ण होत पर्यंत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे लढाऊ नेते कॉम्रेड विनोद झोडगे यांचे लक्ष राहणार आहे.








