चिमूर येथे जन्माष्टमीनिमित्त चिमुकल्यांसाठी ‘लिटल राधा-कृष्ण वॉक कॉन्टेस्ट’
१० हून अधिक प्रसिद्ध रील स्टार्स राहणार उपस्थित; राधा-कृष्ण वेशभूषेतील बालकलाकारांचे सादरीकरण
प्रतिनिधी : समीर बल्की
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त टीम राधा कृष्ण यांच्या वतीने चिमुकल्यांसाठी ‘लिटल राधा-कृष्ण वॉक कॉन्टेस्ट २०२६’ या आगळ्यावेगळ्या सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २६ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता मिलन हॉल, मेन रोड, चिमूर येथे हा कार्यक्रम रंगणार आहे.
बालकांमध्ये भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि राधा-कृष्ण भक्तीची गोडी निर्माण व्हावी, तसेच त्यांच्या कलागुणांना आणि सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत चिमुकले राधा-कृष्णाच्या आकर्षक वेशभूषेत सहभागी होऊन आपल्या निरागस अभिनय, आत्मविश्वास आणि सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकणार आहेत. कार्यक्रमात मान्यवरांचे मार्गदर्शन तसेच कलाकारांचा सत्कार करण्यात येणार असून, त्यानंतर ‘लिटल राधा-कृष्ण वॉक कॉन्टेस्ट’ घेण्यात येणार आहे. उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या बालकलाकारांना आकर्षक ट्रॉफी, सन्मानचिन्हे आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे १० हून अधिक प्रसिद्ध रील स्टार्सची उपस्थिती. सहभागी बालकांना या कलाकारांना भेटण्याची तसेच त्यांच्यासोबत फोटो काढण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे चिमूर परिसरातील पालक व बालकांमध्ये या उपक्रमाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, स्पर्धेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक पालकांनी आपल्या पाल्याची नोंदणी तेजस मिसार ट्रान्सफॉम डान्स अकॅडमी यांच्याकडे करून घ्यावी, असे आवाहन टीम राधा कृष्ण यांच्या वतीने तेजस मिसार. गुरुदास ठाकरे. माधुरी कावरे. मनीषा घाडगे. ज्योती केमये. श्रीहरी सातपुते. शेखर एकोणकर यांनी केले आहे.








