पाच महिन्यांपासून वेतन नाही; कंत्राटी कर्मचाऱ्यांचे संसार आर्थिक संकटात
प्रतिनिधी : समीर बल्की
चिमूर : विकसित भारत, रोजगार आजीविका मिशन (ग्रामीण) अर्थात व्ही.बी.जी. राम.जी. अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मागील पाच महिन्यांपासून वेतन थकीत असल्याने कर्मचाऱ्यांसमोर गंभीर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. नियमितपणे सेवा बजावूनही वेळेवर वेतन मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून, काही कुटुंबांवर उपासमारीची वेळ आल्याची व्यथा कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
गेल्या पाच महिन्यांपासून वेतन न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांना घरखर्च भागविताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. किराणा, घरभाडे, वीजबिल, मुलांचे शिक्षण, आरोग्यविषयक खर्च तसेच इतर दैनंदिन गरजा भागविणे कठीण झाले आहे. अनेक कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तू उधारीवर घ्याव्या लागत असून, वाढत्या आर्थिक अडचणींमुळे कुटुंबावर कर्जाचा भार वाढत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
सेवा नियमित, मात्र वेतनासाठी प्रतीक्षा
कंत्राटी कर्मचारी आपल्या जबाबदाऱ्या नियमितपणे पार पाडत असून, शासनाच्या विविध योजना व ग्रामीण भागातील कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी सेवा बजावत आहेत. मात्र, त्यांच्या वेतनाबाबत सातत्याने दिरंगाई होत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. पाच महिन्यांचे वेतन थकीत राहिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वेतन थकीत असल्यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे. संबंधित विभागाने निधी व वेतन वितरणातील अडचणी दूर करून थकीत पाच महिन्यांचे संपूर्ण वेतन कर्मचाऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
वेतन वेळेवर मिळण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था करा
केवळ थकीत वेतन अदा करून प्रश्न सोडविण्याऐवजी भविष्यात कंत्राटी कर्मचाऱ्यांना दर महिन्याला वेळेवर वेतन मिळेल, यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात यावी, अशीही मागणी आहे. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता वेतनाचा प्रश्न आणखी लांबवू नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, संबंधित विभाग व प्रशासन या गंभीर प्रश्नावर कोणती भूमिका घेते आणि पाच महिन्यांपासून थकीत असलेले वेतन कर्मचाऱ्यांना नेमके कधी मिळते, याकडे कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांचे लक्ष लागले आहे.








