पुण्यात ६ ते ८ सप्टेंबरदरम्यान आंतरराष्ट्रीय डाळिंब परिषद २०२६
प्रतिनिधी : प्रमोद डफळ
राहुरी विद्यापीठ, दि. 5 सप्टेंबर, 2026 बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर डाळिंब उत्पादन अधिक शाश्वत, हवामान-सक्षम आणि जागतिक बाजारपेठेसाठी स्पर्धात्मक करण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय डाळिंब परिषद २०२६ चे आयोजन ६ ते ८ सप्टेंबर २०२६ दरम्यान यशदा, पुणे येथे करण्यात आले आहे.
भारतीय कृषी अनुसंधान परिषद–राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र , सोलापूर आणि सोसायटी फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ रिसर्च ऑन पोमोग्रानेट (SARP), सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या सहयोगाने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.
“अमृतकाळासाठी हवामान-सक्षम डाळिंब परिसंस्था : शाश्वतता, नवोपक्रम आणि जागतिक आरोग्याला चालना” हा परिषदेचा मुख्य विषय आहे. भारतासह विविध देशांतील नामवंत शास्त्रज्ञ, संशोधक, शेतकरी, उद्योजक, उद्योग प्रतिनिधी आणि धोरणकर्ते या परिषदेत सहभागी होणार आहेत.
भारतात सुमारे २.२४ लाख हेक्टर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड केली जाते. मात्र, बदलत्या हवामानामुळे फुलगळ व फळगळ, शॉट होल बोरर, थ्रिप्स, जिवाणूजन्य करपा, मर रोग समूह, फळकूज आणि सेरकोस्पोरा फळठिपके (टिकरी) यांसारख्या समस्या डाळिंब उत्पादकांसमोर आव्हान निर्माण करीत आहेत. या पार्श्वभूमीवर परिषदेत डाळिंब जनुकशास्त्र, सुधारणा व जैवतंत्रज्ञान; हवामान-स्मार्ट उत्पादन व पीक संरक्षण; सूक्ष्मजीवशास्त्र व जैव-निविष्ठा; काढणीनंतरचे व्यवस्थापन, प्रक्रिया व मूल्यवर्धन; तसेच जागतिक बाजारपेठेतील संधी या विषयांवर तांत्रिक सत्रे होणार आहेत. याशिवाय शेतकरी–संशोधक–उद्योजक संवाद हा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला असून, शेतकऱ्यांच्या नवकल्पना, तंत्रज्ञान आणि व्यावहारिक उपाययोजनांची देवाणघेवाण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
परिषदेस डॉ. मांगी लाल जाट, सचिव, कृषि संशोधन व शिक्षण विभाग , कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार तथा महासंचालक, भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली; डॉ. संजय कुमार सिंह, उपमहासंचालक (उद्यानविद्या), भाकृअप; आणि डॉ. विलास खर्चे, कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्यासह कृषी क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी, शास्त्रज्ञ व तज्ज्ञांची उपस्थिती राहणार आहे. डॉ. राजीव अरविंद मराठे, संचालक, भाकृअप -राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर आणि डॉ. प्रशांत बोडके, संचालक, संशोधन, राहुरी विद्यापीठ, हे परिषदेचे संयोजक आहेत.
या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून शेतकरी–संशोधन–तंत्रज्ञान–उद्योग–बाजारपेठ यांच्यातील दुवा अधिक मजबूत होऊन भारतातील डाळिंब उत्पादनाला हवामान-सक्षम, शाश्वत आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक दिशा मिळण्यास मदत होणार आहे.
कुलगुरूंचा संदेश….
“महाराष्ट्रातील डाळिंब उत्पादनाच्या विकासात महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण राहिले आहे. गणेशपासून फुले भगवा आणि फुले भगवा सुपरपर्यंत विविध महत्त्वपूर्ण वाणांच्या विकासाद्वारे विद्यापीठाने डाळिंब संशोधन व उत्पादनाला नवी दिशा दिली असून महाराष्ट्राच्या डाळिंब क्षेत्राच्या प्रगतीत मोलाची भूमिका बजावली आहे. विशेषतः फुले भगवा या वाणाने भारतीय डाळिंबाला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विशेष स्थान मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर डाळिंब क्षेत्रासमोरील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी संशोधन, नवोपक्रम आणि शेतकऱ्यांचे अनुभव यांची सांगड आवश्यक आहे. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर आणि सोसायटी फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ रिसर्च ऑन पोमोग्रानेट, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय डाळिंब परिषद २०२६ मध्ये MPKV, राहुरी एक महत्त्वपूर्ण सहयोगी भागीदार म्हणून सहभागी होत आहे. बदलत्या हवामानातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी संशोधन, नवोपक्रम आणि शेतकऱ्यांचे अनुभव यांची सांगड घालणारी ही परिषद डाळिंब क्षेत्राच्या शाश्वत, हवामान-सक्षम आणि अधिक लाभदायक विकासाला निश्चितच नवी दिशा देईल.”
डॉ. विलास के. खर्चे
कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
संचालक, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र यांचा संदेश…
भारतातील डाळिंब संशोधन, तंत्रज्ञान विकास आणि शाश्वत उत्पादनाला दिशा देण्यात भाकृअप–राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूरची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. हवामान बदल, कीड व रोग, उत्पादनाची गुणवत्ता व सुरक्षितता तसेच बदलती बाजारपेठ यांसारख्या आव्हानांवर मात करण्यासाठी केंद्र सातत्याने संशोधन, तंत्रज्ञान विकास आणि शेतकरी-केंद्रित उपाययोजनांवर कार्यरत आहे. आंतरराष्ट्रीय डाळिंब परिषद २०२६च्या माध्यमातून देश-विदेशातील शास्त्रज्ञ, संशोधक, शेतकरी, उद्योजक आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांना एकत्र आणून डाळिंब संशोधन, हवामान-सक्षम उत्पादन, पीक संरक्षण, काढणीनंतरचे व्यवस्थापन, प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि जागतिक बाजारपेठेतील संधी यांवर विचारमंथन होणार आहे. या ज्ञानविनिमयातून निर्माण होणारे तंत्रज्ञान व नवोपक्रम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून भारतीय डाळिंब क्षेत्र अधिक शाश्वत, गुणवत्तापूर्ण, लाभदायक आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक करण्यास ही परिषद निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेल.
डॉ. आर. ए. मराठे, संचालक, ICAR–राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर








