नांदेड येथे मुखेड तालुका व शहराध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या मुलाखती संपन्न
मनोज बिरादार | मुखेड ता. प्रतिनिधी
मुखेड काँग्रेस कमिटीच्या शहराध्यक्ष व तालुकाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी नांदेड येथील काँग्रेस भवनात पक्षनिरीक्षकांच्या उपस्थितीत इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या.ही संपूर्ण प्रक्रिया पक्षनिरीक्षक खासदार कल्याण काळे आणि मा.राजाभाऊ देशमुख यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.
यावेळी खासदार प्रा.रवींद्र चव्हाण,माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर,काँग्रेसचे प्रदेश महासचिव डॉ.श्रावण रॅपणवाड यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व दोन्ही पदांचे सर्व भावी उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुखेड तालुकाध्यक्ष पदासाठी काँग्रेस पक्षातून अनेकांनी दावेदारी सांगत आपले अर्ज दाखल केले.यात प्रामुख्याने तालुका काँग्रेसचे लढवय्ये कार्याध्यक्ष संभाजी पाटील उन्द्रीकर,आजी तालुकाध्यक्ष राजीव पाटील रावणगावकर,शहराध्यक्ष हणमंत नारनाळीकर,दिनेश आप्पा आवडके आणि युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव सुनिल पाटील आरगीळे यांचा समावेश आहे.या उमेदवारांच्या मुलाखती घेऊन पक्षाच्या मजबुतीसाठी त्यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली.
शहराध्यक्षपदाच्या निवडीसाठी हणमंत नारनाळीकर यांचा फेरनिवडीसाठी एकमेव अर्ज दाखल झाला.शहरामध्ये त्यांनी केलेल्या सामाजिक व राजकीय कार्याचा सविस्तर कार्यअहवाल खासदार प्रा.रवींद्र चव्हाण व माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर व पक्षनिरीक्षकाकडे सोपवण्यात आला.एकमेव अर्ज आल्यामुळे शहराध्यक्षपदी नारनाळीकर यांच्या निवडीची औपचारिक घोषणा बाकी असल्याचे मानले जात आहे.
या मुलाखतींनंतर वरिष्ठ नेते कोणता निर्णय घेतात आणि मुखेड तालुका व शहर काँग्रेसची धुरा कोणाच्या खांद्यावर सोपवली जाते,याकडे तालुकाभरातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.








