मीटर सुस्थितीत असतानाही रीडिंग नाही; सरासरी बिलाच्या नावाखाली ग्राहकांना वेठीस धरण्याचा आरोप…
‘मीटर जुने आहे, रीडिंग होत नाही’ सांगत डिजिटल मीटर बसविण्याचा सल्ला; ग्राहकांमध्ये नाराजी !
बातमी सम्राट | दिनेश गायकवाड | राहुरी | दि. ०४/१०/२०२६/
राहुरी : वीज मीटर सुस्थितीत असूनही त्याचे नियमित रीडिंग घेतले जात नसल्याच्या तक्रारी काही वीज ग्राहकांकडून समोर येत आहेत. मीटरचे रीडिंग घेण्यात न आल्याने ग्राहकांना सरासरी युनिटच्या आधारे वीजबिले दिली जात असल्याचा आरोप करण्यात येत असून, यामुळे ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काही ग्राहकांनी याबाबत संबंधित महावितरण कार्यालयाशी संपर्क साधला असता, ‘हे मीटर जुने आहे, याचे रीडिंग होत नाही. त्यामुळे आपल्याला असेच सरासरी युनिटचे बिल सुरू राहील; अन्यथा नवीन डिजिटल मीटर बसवून घ्यावा लागेल,’ असे सांगण्यात येत असल्याचा दावा ग्राहकांनी केला आहे.
मीटर सुस्थितीत असताना त्याचे प्रत्यक्ष रीडिंग का घेतले जात नाही, असा सवाल ग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे. प्रत्यक्ष वापराची नोंद न घेता सरासरी युनिटच्या आधारे बिल आकारले गेल्यास ग्राहकांच्या प्रत्यक्ष वीज वापरात आणि बिलातील युनिटमध्ये तफावत निर्माण होण्याची शक्यता आहे. परिणामी कमी वापर असतानाही जादा बिलाचा आर्थिक भार ग्राहकांवर पडू शकतो.
विशेषतः ग्रामीण भागातील अनेक ग्राहकांना वीजबिलातील तांत्रिक बाबींची पुरेशी माहिती नसल्याने त्यांना अशा प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मीटरचे रीडिंग घेण्यात न आल्याने बिलात काही त्रुटी असल्यास त्या दुरुस्त करून घेण्यासाठी ग्राहकांना महावितरण कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागू शकतात.
मीटर जुने असल्याचे कारण देऊन सरासरी बिल सुरू ठेवण्याऐवजी संबंधित यंत्रणेने प्रत्यक्ष मीटरची तांत्रिक तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी. मीटरमध्ये दोष असल्यास तो दुरुस्त करावा किंवा नियमानुसार पुढील कार्यवाही करावी; मात्र ग्राहकांना विनाकारण त्रास होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे.
दरम्यान, मीटरचे रीडिंग न घेता सरासरी बिल आकारले जात असल्याच्या तक्रारींची महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घ्यावी. ग्राहकांना त्यांच्या प्रत्यक्ष वीज वापरानुसार अचूक बिल मिळावे आणि अनावश्यक आर्थिक भार व मानसिक त्रास सहन करावा लागू नये, यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी वीज ग्राहकांकडून जोर धरू लागली आहे.








