प्रतिनिधी : दिनेश गायकवाड
राहुरी : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या विभागाचे सुत्र हाती घेतल्यानंतर विभाग अलर्ट मोडवर आला असून, आता सणासुदीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी छापे घालत ग्राहकांना भेसळीच्या वस्तूंपासून संरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करताना पहावयास मिळत आहे. ऐन सणासुदीच्या काळात राहुरीत निकृष्ट खाद्यतेल विक्री करत असल्याचा संशय पथकाला आल्याने अन्न व औषध प्रशासनाने तब्बल ६ लाख रुपयांचा सोयाबीन तेलसाठा जप्त केला आहे. राहुरीतील या मोठ्या कारवाईमुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले आहे.
आगामी सण-उत्सवांच्या काळात भेसळयुक्त आणि निकृष्ट अन्नपदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार राहुरी शहरात मोठी धडक कारवाई करण्यात आली आहे. येथील आनंद ट्रेडिंग कंपनीवर अचानक छापा टाकून अधिकाऱ्यांनी ६ लाख २१ हजार ६०० रुपये किमतीचा संशयास्पद रिफाइंड सोयाबीन तेलसाठा जप्त केला आहे. सण-उत्सव विशेष तपासणी मोहिमेंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून आनंद ट्रेडिंग कंपनीच्या गोदामात लेबलिंग नियमांचे उघड-उघड उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे. कारवाईदरम्यान नवकार रिफाइंड सोयाबीन तेलाचे ६०० लिटर, आनंद रिफाइंड सोयाबीन तेलाचे २ हजार १०० किलो आणि ४६८ किलो असा एकूण ६ लाख २१ हजार ६०० रुपयांचा तेलाचा मोठा साठा ताब्यात घेण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेले तेल कमी दर्जाचे (सब-स्टँडर्ड) असल्याचा संशय असून तपासणीसाठी त्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे, सहआयुक्त एम. यु. माने आणि सहाय्यक आयुक्त ए. ए. भोईते यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी यु. आर. पाटील यांच्या पथकाने ही धडक मोहीम राबवली. सणासुदीच्या काळात खाद्यतेलाची मागणी वाढल्याचा गैरफायदा घेऊन ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कोणत्याही व्यापाऱ्याची गय केली जाणार नाही, असा कडक इशारा प्रशासनाने दिला असून या कारवाईमुळे राहुरी मधील व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.








